मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी ‘‘एक हात मदतीचा’’ : पिंपरी-चिंचवडमधून ५० गाड्यांची मदत रवाना

मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी ‘‘एक हात मदतीचा’’ : पिंपरी-चिंचवडमधून ५० गाड्यांची मदत रवाना
पिंपरी-चिंचवड, ता. १० :
मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकरी आणि कष्टकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी ‘‘एक हात मदतीचा’’ या उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवडमधून तब्बल ५० गाड्यांची मदत रवाना झाली. या मदतीद्वारे सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील १०० हून अधिक गावांतील सुमारे १८ हजार ४०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्य पोहोचवले जाणार आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, मोशी येथे गाड्यांचे पूजन करून मदत रवाना करण्यात आली. या उपक्रमाचा पुढाकार हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट यांनी घेतला असून, कार्यक्रमाला भाजपचे आजी-माजी पदाधिकारी, ट्रस्टचे पदाधिकारी आणि विविध स्वयंसेवी संस्था उपस्थित होत्या.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपा- महायुती सरकारने राज्यातील पूरग्रस्तांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. या प्रेरणेनेच पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक, सामाजिक संस्था आणि भाजपा कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन लोकसहभागातून ही मदत उभी केली आहे.
पूर्वी कोकणातील निसर्ग चक्रीवादळ किंवा पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीच्या वेळी जसे ‘‘एक हात मदतीचा’’ अभियान हाती घेण्यात आले होते, तसाच निर्धार यावेळीही मराठवाड्यातील बांधवांसाठी करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात जीवनावश्यक वस्तू, दुसऱ्या टप्प्यात गोधन दान, तर तिसऱ्या टप्प्यात शैक्षणिक मदत व सहकार्य देण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.
प्रतिनिधी
विजय अडसूळ
