! क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावा — अॅड. संभाजी पवार यांची मागणी

नेवासा, दि. ८ (प्रतिनिधी):
नेवासा तालुक्यात प्रस्तावित असलेल्या क्रीडा संकुलाच्या कामात होत असलेल्या विलंबाबद्दल मराठा समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष अॅड. संभाजी पवार यांनी हे काम त्वरित मार्गी लावण्यासाठी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.
नेवाशातील क्रीडाप्रेमी आणि युवा खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे हे संकुल अद्याप जागेअभावी अपूर्ण असल्याने, मराठा समाज सेवा संस्थेने हा विषय पुन्हा एकदा पुढे आणला आहे. नेवासा खुर्द येथील निवडलेल्या जागेबाबत काही खेळाडू व नागरिकांनी आक्षेप नोंदविल्याने, संस्थेने पर्यायी जागेची मागणी तहसीलदारांकडे यापूर्वीच केली होती.नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी नवीन जागेसंदर्भात अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना केलेल्या आहेत.
अॅड. संभाजी पवार म्हणाले, “नेवासा येथे जलतरण तलाव, इनडोअर स्टेडियम, क्रिकेट मैदान ,कबड्डी ,खोखो,हॉलिबॉल अशा सर्व खेळांसाठी उपयुक्त असे आधुनिक सोयींनी सुसज्ज क्रीडा संकुल उभारले जावे, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. आमदार विठ्ठलराव लंघे यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा. यामुळे तालुक्यातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि क्रीडाक्षेत्रात नेवासाचे नाव उज्ज्वल होईल.”
या मागणीला संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा एकमुखी पाठिंबा लाभला आहे. आमदार लंघे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार तातडीने हालचाली होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या मागणीचा पाठपुरावा करणाऱ्यांमध्ये अॅड. संभाजी पवार, अॅड. अशोक करडक, उपाध्यक्ष अशोक वाकचौरे, डॉ करणसिंह घुले,बाळासाहेब भदगले पाटील, होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे,डॉ श्रवण एरंडे, चंद्रकांत कदम टेलर,अॅड. संदीप शिंदे आणि अॅड. मनोज हारदे यांचा समावेश आहे.
प्रतिनिधी :शाम शिरसाठ.
