खड्ड्यातील रस्त्याने मृत्यूला आमंत्रण, वाहनासोबत माणसेही झाली खिळखिळी
दाभाडे चौक ते मरकळ मार्ग नदी पुलाची दुरवस्था, नागरिकांची प्रशासनाकडे संतप्त मागणी
खड्ड्यातील रस्त्याने मृत्यूला आमंत्रण, वाहनासोबत माणसेही झाली खिळखिळी
दाभाडे चौक ते मरकळ मार्ग नदी पुलाची दुरवस्था, नागरिकांची प्रशासनाकडे संतप्त मागणी

भोसरी | प्रतिनिधी
दाभाडे चौक ते मरकळ मार्गावरील नदी पुलाजवळील रस्ता अक्षरशः खड्ड्यात परिवर्तित झाला आहे. खोल खड्डे, उखडलेला डांबर आणि वाहतुकीची वाढती कोंडी यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
चऱ्होली परिसर हा पूर्णपणे रहिवासी असून, येथे नवीन नवीन गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झालेल्या या भागातील नागरिक आणि व्यापारी यांची प्रकल्पांप्रती पसंती वाढली असली तरी, मूलभूत सुविधांचा अभाव पाहून ते नाराजी व्यक्त करत आहेत.
“मृत्यू हवा असेल तर याच रोडने प्रवास करावा,” अशी तीव्र भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या मार्गाने मरकळ MIDCकडे जाणारी मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. मात्र, पुलावरील आणि लगतच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत असून, प्रवासादरम्यान कंबरदुखीचा त्रास होत असल्याची तक्रार वाहनधारकांनी केली आहे.
स्थानिकांचा आरोप आहे की, रस्त्याच्या दुरुस्तीची कामे केवळ कागदावरच दिसतात. पावसाळ्यानंतर प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पुलाखाली साचलेले पाणी आणि चिखल यामुळे रस्त्यावर घसरट पृष्ठभाग तयार झाला आहे. रात्रीच्या वेळी प्रकाशयोजनेचा अभाव असल्याने अपघातांचा धोका आणखी वाढला आहे.
नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
प्रतिनिधी -विजय अडसूळ
