गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर वाकलेल्या झाडांमुळे विसर्जन मिरवणुकीत अडथळा; प्रशासनाची उदासीनता कायम

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर वाकलेल्या झाडांमुळे विसर्जन मिरवणुकीत अडथळा; प्रशासनाची उदासीनता कायम
पुणे, चिंचवड,तानाजीनगर | 23 ऑगस्ट 2025
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला, तानाजीनगर, पोदार शाळा, श्री शिवाजी उदय मंडळ रोड, विवेक वसाहत, काकडे पार्क, केशवनगर गणेश विसर्जन घाट रस्त्यावर गणपतींच्या आगमन व विसर्जन मिरवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार आहे. मात्र, या मुख्य रस्त्यांवर झाडांच्या मोठमोठ्या फांद्या रस्त्यावर झुकलेल्या असून त्यामुळे मोठ्या मूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.
स्थानिक नागरिक, गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांना फांद्या हाताने किंवा बांबूच्या सहाय्याने बाजूला करून मार्ग मोकळा करावा लागतो. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही झाडांची छाटणी वेळेत करण्यात आलेली नाही.
महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी याबाबत अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांना कल्पना दिली असूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, असे त्यांनी सांगितले. “दरवर्षीप्रमाणे, ऐनवेळी थोड्याशा फांद्या छाटून प्रशासन वेळ मारून नेतं. परंतु यंदा जर दोन दिवसात झाडांची योग्य ती छाटणी झाली नाही, तर आम्ही स्वतः झाडांच्या अडथळा ठरणाऱ्या फांद्या छाटून त्या ब प्रभाग कार्यालय व उद्यान विभाग कार्यालयात नेऊन टाकू,” असा इशाराही मधुकर बच्चे यांनी दिला आहे.
या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उत्सव साजरा करताना सामान्य नागरिक, महिला, लहान मुले आणि मंडळांचे कार्यकर्ते यांना त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिक व मंडळांची मागणी आहे की, प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सर्व रस्त्यांवरील अडथळा ठरणाऱ्या झाडांची छाटणी करून गणेशोत्सवाचे सुरळीत आयोजन सुनिश्चित करावे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

