ओम गणेश सोसायटीत गुरुपौर्णिमेनिमित्त जेष्ठांचा गौरव
गुरुपौर्णिमेनिमित्त ओम गणेश सोसायटीत जेष्ठ नागरिकांचा भावनिक सन्मान
चिंचवड (११ जुलै २०२५): चिंचवड येथील काकडे टाऊनशिपमधील ओम गणेश सोसायटीत गुरुपौर्णिमेनिमित्त भावनिक आणि संस्कृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नेहमीच सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करणाऱ्या या सोसायटीत यंदा गुरुपौर्णिमा खास ठरली, कारण यानिमित्ताने सोसायटीतील जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री दत्त व श्री स्वामी समर्थ यांच्या मूर्ती पूजनाने झाली. त्यानंतर सुमारे २५ ते ३० जेष्ठ नागरिकांचे औक्षण, पूजन व पुष्पवर्षाव करण्यात आला. त्यांना श्रीफळ, गुलाबपुष्प व माऊलींचा फोटो देत सन्मानित करण्यात आले. यावेळी अनेक जेष्ठांनी आपल्या भावना व्यक्त करताना हृदयस्पर्शी मनोगते मांडली, त्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले.
कार्यक्रमात महाआरती, भक्तीमय भजन व महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, आणि सर्वांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाची संकल्पना अध्यक्ष श्री. मधुकर बच्चे यांनी मांडली होती. त्याला तात्काळ सर्व पदाधिकारी व सदस्यांचे उत्स्फूर्त अनुमोदन लाभले. कमिटी पदाधिकारी अध्यक्ष मधुकर बच्चे,खजिनदार श्री. अजित नाईक, सेक्रेटरी श्री. राजू कोरे तसेच सर्व कमिटी सदस्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी आणि मनोवेधक ठरला.कार्यक्रमाचे आयोजन श्री दत्त आरती मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे