आमदार निवासात कँटीन कामगाराला मारहाण; निकृष्ट जेवणावरून आमदार संजय गायकवाडांचा संताप, व्हिडीओ व्हायरल
आमदार निवासात कँटीन कामगाराला मारहाण; निकृष्ट जेवणावरून आमदार संजय गायकवाडांचा संताप, व्हिडीओ व्हायरल
दि. ९ जुलै
आमदार निवासात घडलेला एक प्रकार सध्या मोठ्या वादात सापडला आहे. शिवसेना (शिंदे गट) चे आमदार संजय गायकवाड यांनी निकृष्ट जेवण दिल्याच्या कारणावरून कँटीनमधील एका कामगाराला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार निवासातील कँटीनमध्ये दिले गेलेले जेवण अत्यंत खराब होते. यामुळे आमदार गायकवाड यांनी आपला संताप व्यक्त करत संयम हरपून संबंधित कामगाराला चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. उपस्थित काही लोकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत केला.
या घटनेबाबत अनेकांनी “लोकप्रतिनिधींकडून अशी वागणूक अत्यंत निंदनीय असून कायदा सर्वांसाठी समान आहे,” अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, काहींनी कँटीन प्रशासनालाही दोषी ठरवले आहे. निकृष्ट अन्न पुरवून लोकांच्या आरोग्याशी खेळ करण्यात आला आहे, असा आरोप करत संबंधित कँटीनवरही चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
या प्रकरणावरून एक महत्त्वाचा प्रश्नही समोर येतो आहे — “जर आमदारांना असे अन्न दिले जात असेल, तर सामान्य नागरिकांचे काय?”
या प्रश्नानेच शासन व्यवस्थेतील अन्नपुरवठा व गुणवत्ता व्यवस्थापनावर मोठा सवाल उपस्थित केला आहे.