टिळक रोडवरील मातृमंदिर शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाचा उत्साहात प्रारंभ: विद्यार्थी आणि पालकांचे जल्लोषात स्वागत!

टिळक रोडवरील मातृमंदिर शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाचा उत्साहात प्रारंभ: विद्यार्थी आणि पालकांचे जल्लोषात स्वागत!
पुणे: टिळक रोडवरील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात आणि आनंदात करण्यात आला. मुलांना शाळेची गोडी लागावी आणि त्यांचा शाळेतील पहिला दिवस कायम स्मरणात राहावा यासाठी शाळेने अभिनव पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
शिक्षकांनी ढोल-लेझीमच्या गजरात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी शाळेतील काही विद्यार्थ्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर, आपटे आणि शाहू महाराज यांच्या वेशभूषेत येऊन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
शाळेच्या आवारात सौ. निशा जोशी यांनी मंत्रोच्चारात अग्निहोत्र केले. यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा संचारली. संपूर्ण शाळा आकर्षक पद्धतीने सजवण्यात आली होती. प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांना अष्टगंध लावून औक्षण करण्यात आले आणि बालगीते लावून त्यांचे स्वागत करण्यात आले. मुलांनी आपल्या पालकांसोबत अग्निहोत्र आणि सरस्वतीचा आशीर्वाद घेतला.
यावेळी शाळेच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री ठकार आवर्जून उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांनी विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा पहिला दिवस उत्साहात आणि आनंदात पार पडला. हा सोहळा मुलांच्या मनात शाळेबद्दल एक सकारात्मक आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा ठरला.
प्रतिनिधी ; उमेश कुलकर्णी पुणे