पुणे रेल्वे स्थानकावरील सुरक्षा यंत्रणा होणार अधिक बळकट – ZRUCC च्या 126व्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

पुणे रेल्वे स्थानकावरील सुरक्षा यंत्रणा होणार अधिक बळकट – ZRUCC च्या 126व्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
मुंबई, ५ जून २०२५:
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई येथे पार पडलेल्या झोनल रेल्वे यूझर्स कन्सल्टेटिव्ह कमिटी (ZRUCC) च्या 126व्या बैठकीत पुणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेसंदर्भात महत्त्वाचे मुद्दे चर्चिले गेले. या बैठकीत ZRUCC सदस्य चैतन्य ज्योती नरेंद्र जोशी यांनी पुणे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने दोन महत्त्वाचे मुद्दे ठामपणे मांडले.
१. CCTV कॅमेऱ्यांची उभारणी लवकरच पूर्णत्वास:
पुणे रेल्वे स्थानकावर गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या CCTV कॅमेऱ्यांच्या यंत्रणेचा प्रश्न बैठकीत मांडण्यात आला. यावर बोलताना जोशी यांनी २३ मार्च २०२३ रोजी रेल्वे बोर्डाकडून मंजूर करण्यात आलेल्या १०० कोटींच्या निधीचा उल्लेख केला. या निधीतून १५० अत्याधुनिक CCTV कॅमेरे पुणे स्थानकावर बसवले जाणार असून, यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेत लक्षणीय वाढ होणार आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रकल्पाची अंमलबजावणी लवकरच पूर्ण होईल, अशी ग्वाही दिली.
२. फुल बॉडी स्कॅनर व बॅगेज स्कॅनरची गरज अधोरेखित:
प्रवाशांच्या संपूर्ण सुरक्षेसाठी प्रत्येक प्रवेशद्वारावर फुल बॉडी स्कॅनर व बॅगेज स्कॅनर बसवण्याची गरज देखील जोशी यांनी अधोरेखित केली. वाढत्या सुरक्षेच्या गरजा लक्षात घेता, ही यंत्रणा तातडीने उभी करण्याची मागणी करण्यात आली. यावरही रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच आवश्यक पावले उचलली जातील, अशी माहिती दिली.
चैतन्य जोशी यांनी या निर्णयांविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले, “प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा या माझ्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहेत. ही केवळ सुरुवात असून, भविष्यातही आपण रेल्वे सेवांमध्ये अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी कटिबद्ध आहोत.”
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी पुणे 9822548429
–