कोथरूड पोस्टर प्रकरणावरून ब्राह्मण महासंघ आक्रमक; ठाकरे गटाच्या पोस्टरबाजीला विरोध
कोथरूड पोस्टर प्रकरणावरून ब्राह्मण महासंघ आक्रमक; ठाकरे गटाच्या पोस्टरबाजीला विरोध
पुणे रेल्वे स्थानक नामांतर वादात नव् वळण; मस्तानी पेठ उल्लेखावरून तीव्र प्रतिक्रिया
पुणे, २५ जून २०२५ — पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या मागणीवरून निर्माण झालेल्या वादात आता ठाकरे गटाच्या पोस्टरमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. कोथरूड भागात लावण्यात आलेल्या एका पोस्टरमध्ये भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांना उद्देशून “कोथरूड बाई, आपणांस नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करा…” असा उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टरमुळे ब्राह्मण महासंघाने तीव्र आक्षेप घेतला असून, या मजकुराला ब्राह्मण समाजाच्या इतिहासाचा अपमान करणारा ठरवले आहे.
सदर पोस्टरवर एका स्त्रीचे व्यंगचित्र असून, त्यावर ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख गिरीश गायकवाड यांचे नाव छापलेले आहे. हा मजकूर खासदार मेधा कुलकर्णी यांच्या बाजीराव पेशवे यांच्या नावाने रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्याच्या मागणीला विरोध म्हणून लावण्यात आल्याचे दिसत आहे.
ब्राह्मण महासंघाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष उमेश कुलकर्णी, उदय कुलकर्णी उपाध्यक्ष संजय जोशी, संघटक अविनाश कुलकर्णी यांनी यास तीव्र शब्दांत विरोध नोंदवला असून, “ही टीका फक्त खासदारांवर नाही, तर पेशवे आणि ब्राह्मण समाजाच्या ऐतिहासिक योगदानावरच थेट आघात आहे,” असे मत व्यक्त केले आहे. महासंघाने तात्काळ माफीची मागणी करत, कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितले की, “हा प्रकार केवळ राजकीय प्रतिसाद नसून, तो जातीय तेढ निर्माण करणारा प्रयत्न आहे. शहरातील सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या अशा कृतींवर त्वरित कारवाई झाली पाहिजे.”
नाहीतर हा वाद अधिक चिघळण्याची चिन्हं असून, विविध सामाजिक संघटनांमधून या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.
पुण्यातील संवेदनशील परिसरांमध्ये लावण्यात आलेल्या अशा पोस्टर्समुळे प्रशासनालाही सतर्क राहावे लागत आहे. यामुळे पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा वाद आता एका नव्या आणि अधिक संवेदनशील दिशेने जात असल्याचे स्पष्ट झाले आहे
.