ज्येष्ठ शिक्षक प्रभाकर शंकर विळदकर यांचे निधन

ज्येष्ठ शिक्षक प्रभाकर शंकर विळदकर यांचे निधन
पाथर्डी (अहिल्यानगर), १४ जून २०२५ :
पाथर्डी येथील ज्येष्ठ व आदर्श शिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. प्रभाकर शंकर विळदकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने पाथर्डी परिसरात शोककळा पसरली आहे.
श्री. विळदकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसाराला वाहून घेतले होते. शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले. त्यांचा विद्यार्थ्यांवरील प्रभाव, शिस्तप्रियता आणि अभ्यासू वृत्तीमुळे ते शिक्षकवृंद व पालक यांच्यातही अत्यंत आदरणीय होते.
ते फक्त शिक्षक नव्हते, तर मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत आणि संस्कारांचे भान देणारे व्यक्तिमत्व होते. त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना समाजात विशेष मान्यता प्राप्त होती. त्यांचे मृदू व संयमी बोलणे, तसेच शिक्षणप्रेमी वृत्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती.
श्री. विळदकर यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या जाण्याने एक युग संपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
त्यांच्या पश्चात शोकाकुल विळदकर परिवार, आप्तेष्ट व त्यांचे असंख्य माजी विद्यार्थी आहेत.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
— प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे 9822548429